अमेरिका-इस्रायलचे इराणवर तुफान हल्ले, 5000 लष्करी ठिकाणं बेचिराख, 50 हून अधिक जहाजं उद्ध्वस्त....

Foto
तेहरान : पश्‍चिम आशियातील अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध मंगळवारी 11 व्या दिवशी अधिक भीषण झाले. अमेरिका आणि इस्रायलने इराणमध्ये घुसून तुफान हवाई हल्ले केले. तर प्रत्युत्तरादाखल इराणनेही इस्रायल आणि आखाती देशांच्या दिशेने क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा मारा केला.

दरम्यान, हल्ले सुरूच राहिले तर या भागातून तेलाचा एक थेंबही बाहेर जाणार नाही, असा इशारा इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने  अमेरिकेला दिला आहे. युद्ध कधी संपवायचे हे तेहरानच ठरवेल, असेही इराणने म्हटले आहे. दुसरीकडे, डोनल्ड ट्रम्प यांनी तेल पुरवठा विस्कळीत झाल्यास 20 पट अधिक शक्तीने हल्ले करू, असा इशारा दिला.

याशिवाय, अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी इराण युद्ध हारत असल्याचे म्हणत, आगामी काळात अधिक भयानक हल्ल्यांचे संकेत आहेत. रशियाला यात हस्तक्षेप न करण्याची ताकीदही त्यांनी दिली आहे.
इराणचे संरक्षण अधिकारी अली लारिजानी यांनीही ट्रम्प यांना थेट प्रत्युत्तर दिले आहे. तसेच आपण अमेरिकेच्या पोकळ धमक्यांना घाबरत नाही, असे म्हटले आहे. दरम्यान, परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी, अमेरिकेने दोन वेळा चर्चा सुरू असतानाच हल्ले केले. यामुळे आता चर्चा नाही.

रॉयटरने दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायलच्या जेरूसलेम आणि तेल अवीवमध्ये मंगळवारी सायरन वाजल्यानंतर, अनेक धमाके एकायला मिळाले. यावेळी इस्रायली हवाई संरक्षण प्रणालींने इराणी क्षेपणास्त्रे रोखण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, इराणी हल्ल्यांमुळे आखाती प्रदेशात तणाव आणखी वाढला.

बहरीनमध्ये एका निवासी इमारतीवर झालेल्या इराणी हल्ल्यात एका 29 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. सौदी अरेबिया आणि कुवैतने इराणचे अनेक ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे, तर युएईमध्ये ड्रोन हल्ल्यामुळे एका तेल डेपोला आग लागली असून दोन रिफायनरी बंद करण्यात आल्या आहेत.

न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेने पहिल्या 10 दिवसांत इराणच्या 5000 हून अधिक लष्करी तळांना लक्ष्य केले आहे. यामुळे इराणची क्षेपणास्त्र क्षमता 90 टक्के तर ड्रोन क्षमता 83 टक्क्यांनी कमी झाली आहे.
याशिवाय, अमेरिकन नौदलाने इराणची 50 हून अधिक जहाजे आणि नौका नष्ट केल्या असून होर्मुझ सामुद्रधुनीत सुरुंग पेरणाऱ्या जहाजांनाही लक्ष्य करण्यात आले. या संघर्षात आतापर्यंत सात अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला असून 150 जण जखमी झाले आहेत. महत्वाचे म्हणजे, जमखी झालेल्यांपैकी 108 जण पुन्हा सेवेत दाखल झाले आहेत.